पुणे शहर

महाराष्ट्रतील एक शैक्षणिक, सांस्कृतीक व औद्योगिक केंद्र आणि पुणे जिल्ह्याचे व विभागाचे मुख्य ठीकाण. ते १८ अंश ३०’ उ. अक्षांश व ७३ अंश ५३’पू. रेखांशावर, रेल्वेने मुंबईच्या आग्नेयीस १९२ किमी. व समुद्रसपाटीपासुन सरासरी ५६३ मी. उंचीवर वसले आहे. पुणे शहराची लोकसंख्या १९७१  मध्ये ८,५६,१०५ व देहु, दहूरोड,खडकी कँप, पुणे कँप, खडकवासला, लोहगाव, पिंपरी-चिंचवड मिळून बनणाऱ्या पुणे नागरी भागाची एकूण वस्ती ११,३५,०३४ इतकी होती.

पुणे मुळा-मुठा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. मुळा-मुठा सोडल्यास शहरात निरुपयोगी नागझरी, आंबील ओढा व माणिक नाला हे लहान जलप्रवाह आहेत. पुण्याचे सरासरी तापमान १७.२ अंश से. असून दैनिक किमान तापमान सरासरी ११.६६ अंश से., तर दैनिक कमाल तापमान सरासरी २२.७७ अंश से. असते. एप्रिल महिन्यात कमाल तापमानाची सरासरी ३८.३३ अंश से. इतकी आढळते. ३० एप्रिल १८९७ व ७ मे १८८९ रोजी निरपेक्ष कमाल तापमान ४३.३ अंश से. नोंदविले आहे. पावसाची वार्षिक सरासरी ६६.१३ सेंमी. आहे.

पुणे महाराष्ट्रातील अतिप्रचीन शहरांपैकी एक आहे. पुण्याजवळच मुठेच्या काठी निदान दीड-दोन लाख वर्षांपूर्वीची प्राचीनतम अश्मयुगीन हत्यारे सापडली. गेली किमान दोन हजार वर्षे हे गाव महत्व पावल्याचे दिसते. राष्ट्रकूट राजा कृष्णा याने दिलेल्या ९९३ च्या ताम्रशासनात हे गाव व त्याभोवतालचा प्रदेश यांचे निर्देश पुण्य, पुनक व पुणकविषय देश असे आले असून ते त्या वेळी साधारणपणे एका जिल्ह्याएवढ्या प्रदेशाचे मुख्य ठिकाण होते.

पाताळेश्वर गुहेतील लेख अस्पष्ट असला, तरी ती गुहा व पर्वतीच्या टेकडीतील गुहा या इसवी सनाच्या दहाव्या शतकातीन सहज असतील पाताळेश्वर गुहेतील नंदी-मंडप वैशिष्टपूर्णआहे . तो नंदी-मंडप म्हणू लागले आहेत. अल्लाउद्दीन खलजीने यादवांचा पराभव केल्यानंतर लवकरच पुणे मुसलमानी अंमलाखाली गेले. त्या वेळी मुठा नदीच्या काठी असलेल्या नारायणेश्वर व पुण्येश्वर या देवळांचे थोरला व धाकटा शेख सल्ला या दोन दर्ग्यांत रुपांतर झाले. तददर्शक अवशेष अजूनही तेथे दिसून येतात. १४९० पर्यंत बहमनी, त्यानंतर १६३६ पर्यंत निजामशाही न नंतर आदिलशाही सत्तेखाली हे गाव गेले.

१६२४ च्या सुमारास शहाजी भोसले यास पुणे व सुपे यांच्या भेवतालच प्रदेश मोकासा म्हणून मिळाला. त्या वेळी ते गाव कसबे पुणे म्हणून ओळखले जाई. आताची कसबा पेठ म्हणजे जुने पुणे होय. १६३२ च्या सुमारास विजापूरचा सरदार रायाराव याने पुणे जाळून त्यावर गाढवाचा नांगर फिरविला होता; पण १६३६ मध्ये शहाची भोसल्यास भीमा आणि नीरा या नद्यांमधील प्रदेश जहागिरी मिळाल्यावर पुण्याची पुन्हा भरमसाट होऊ लागली. बालपणी शिवाजी महाराजांचे काही काळ येथील लाल महाल नावाच्या वास्तूत वास्तव्य होते. औरंगजेबाचा तळ दक्षिणेत पडला असता, त्याने पुण्याचे मुहियाबाद असे नाव ठेवले होते.

१७२६ मध्ये शाहू महाराजांनी पुणे पहिल्या बाजीराव पेशव्यास इनाम दिल्यानंतर या गावाची अधिकच भरभराट होऊ लागली. पहिला बाजीराव, बाळाजी बाजीराव, थोरला माधवराव, सवाई माधवराव आणि दुसरा बाजीराव यांनी हे गाव आपले राहण्याचे मुख्य ठिकाण बनविल्यामुळे त्यास मराठ्यांच्या राजधानीचे स्वरुप आले. या काळात इंग्रज रेसीडेंट पुण्यातच राहत असे. ब्रिटिश अंमलाच्या अगदी आरंभीच्या काळात पुण्याची वस्ती सु. ८० हजार होती.

पेशवाईत अनेक मराठी सरदार वारंवार पुण्यात येत राहिल्यामुळे त्या काळात पुण्याची लोकसंख्या त्यापेक्षा कितीतरी अधिक असली पाहिजे. १८६४ पर्यंत पुणे हिच भारताचीच राजधानी करावी, असा इंग्रजांचा बेत होता. १८५६ मध्ये प्रथम मुंबई-पुणे लोहमार्ग चालू झाला; पण तेव्हा बोर घाट फोडलेला नसल्यामुळे खोपोली ते खंडाळा हे अंतर प्रवाशांना पायी, घोड्यावरुन, पालखी-मेण्यांतून किंवा बैलगाडीने रात्रीच्या वेळी तोडावे लागे. १८५६-५७ साली पुण्यात नगरपालिका स्थापन झाली .१८८६ मध्ये घोरपडी-मिरज हा लोहमार्ग चालू झाला व पुढे तो पुण्यास जोडण्यात आला. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महात्मा फुले, न्यायमुर्ती रानडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, लो. टिळक, आगरकर, महर्षी कर्वे इ. थोर पुरुषांची कर्मभूमी पुणेच बनल्याने त्याचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक महत्व वाढतच गेले.

औद्योगिक नगर म्हणून महाराष्ट्रात पुण्याचे स्थान मुंबईखालोखाल आहे. १९६० नंतर म्हणजे महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर पुण्याचा औद्योगिक विकास वेगाने झाला. या विकासाची बीजे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रुजलेली होती. खडकीचा दारुगोळ्याचा कारखाना (१८६९),मुंढव्याची डेक्कन पेपर मिल्स (१८८५), गुजरात मेटल फॅक्टरी(१८८८),राजा बहादूर मोतीलाल पूना मिल्स (१८९३), हे पुणे परिसरातील सुरुवातीचे काही प्रमुख उद्योग होत.

लोकमान्य टिळकांच्या स्वदेशी चळवळीमुळे पुण्याच्या परिसरात उद्योगधंद्यांना चालना मिळाली. उदा., तळेगावचा काच कारखाना (१९०८). दुसऱ्या महायुध्दकाळात लहानमोठ्या अनेक उद्योगांना वाव मिळाला. खडकीचे किर्लोस्कर ऑईल एंजिन्स (१९४६), हिंदुस्थान अँटीबायॉटिक्स लिमिटेड (१९५५) या उत्पादन संस्थांच्या मागेपुढे अनेक उद्योगधंदे पुणे परिसरात सुरु झाले. १९६० साली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ स्थापन झाले. या संस्थेतर्फे भोसरीजवळ सु. १,२१४ हे . जमीन औद्योगिक वसाहत म्हणून विकसित केली जात आहे. पुणे महानगरपालीकेने १९५६ साली हडपसर औद्योगिक वसाहत स्थापन केली. मुंबईचे सान्निध्य, उत्तमा हवामान,कुशल कामगार  आणि पाणी, वीज, वाहतूक इत्यादींची पुरेशी उपलब्धता यांमुळे पुणे परिसराची झपाट्याने औद्योगिक भरभराट झाली.

पुण्याच्या वायव्येकडील खडकी, पिंपरी, चिंचवड व देहूरोड; उत्तर ईशान्येकडील भोसरी, येरवडा, नगररोड; पूर्वेकडील हडपसर व लोणी हे भाग, तसेच कर्वे मार्ग, रेल्वे स्थानकाचा परीसर, शंकरशेठ मार्ग, गुल़टेकडी इ. विभाग विविध प्रकारच्या लहानमोठ्या उद्योगधंद्यांनी गजबजलेले आहेत. साठे बिस्किट अँड चॉकलेट कंपनी, किर्लोस्कर कमिन्स व किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी, गरवारे नायलॉन्स, टेल्को, बजाज ऑटो, कूपर इंजिनिअरिंग, रस्टन अँड हॉर्न्सबी (इंडीया), बकाव उल्फ, सॅण्डविक एशिया, सिपोरेक्स (इडीया), स्वास्तिक रबर प्रॉडक्टस, सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज यांसारखे उत्पादक उद्योग पुणे परिसरातच आहेत. पुण्याच्या औद्योगिक विकासात काही संस्थांचाही महत्वाचा वाटा आहे. त्यांत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्युट, स्मॉल स्केल इंडस्ट्रीट सर्व्हिस इन्स्टिट्यूट, जनरल मॅकॅनिकल एंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट  इ. उल्लेखनीय आहेत. यांशिवाय पुणे विभागिय उत्पादकता परिषद, शुगर टेकेनॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, फोरम ऑफ इंडस्ट्रीयल टेक्नॉलॉजिस्टस या संस्था उद्योगधंद्यांना चालना देण्यास मदत करतात. म. औ. वि. महामंडळातर्फे पुणे-नगर रस्त्यावर वोघोलीजवळ ६०७ हे. क्षेत्र औद्योगिक वसाहत म्हणून विकसित केले जात आहे.