राजगड (Rajgad)

पुण्यात किल्लाची सफर करताना राजगड किल्ला विसरून कसं चालेल. राजगड हा शिवाजी महाराजांचे वास्तव्य असलेला एक भव्य दिव्य किल्ला आहे. या किल्लावर तीन माच्या आणि एक बालेकिल्ला आहे. राजगड निसर्गसौंदर्याने नटलेला एक किल्ला असून या किल्लावर शिवाजी महाराजांच्या वास्तव्याच्या अनेक खुणा तुम्हाला दिसू शकतात.

रायगड (Raigad)

रायगड किल्याची महाराष्ट्राच्या इतिहासात एक विशिष्ठ ओळख आहे. रायगड किल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून ओळख होती. शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेकदेखील याच गडावर झाला होता. पूर्वी या किल्ल्याचे रायरी नाव होते मात्र नंतर स्वराज्याची राजधानी झाल्यावर या किल्ल्याला रायगड हे नाव देण्यात आले. पुणे शहरात फिरताना रायगड किल्ला पाहण्यास मुळीच विसरू नका. गडावर रोप वेने जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिवाय गडावर राहण्याची आणि जेवणाची सोयदेखील आहे.

शिवनेरी किल्ला (Shivneri)

पुण्यातील जुन्नर गावात शिवनेरी किल्ला आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असल्याने या किल्ल्याला एक अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. गडावर आजही शिवाजी महाराजांच्या जन्माच्या काही खुणा तुम्हाला दिसू शकतात. ज्यांना महाराष्ट्राचा इतिहास आणि शिवाजी महाराजांविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल त्यांनी या स्थळाला अवश्य भेट द्यावी.

पुरंदर (Purandar Fort)

पुण्याजवळ असलेल्या पुरंदर किल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता. त्यामुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कात्रज घाट अथवा दिवे घाट ओलांडून तुम्ही पुरंदरवर जावू शकता. पुरंदराच्या चौफेर माच्या आहेत. पुरंदरसोबतच तुम्ही वज्रगडदेखील पाहू शकता. गडावर पाहण्यासाठी अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत.

लोहगड (Lohagad Fort)

पुणे शहराजवळ असलेला लोहगड हा किल्ला स्वराज्यातील एक बळकट किल्ला होता. गडावर जाण्यासाठी चार प्रमुख प्रवेशद्वार आणि निमुळता रस्ता आहे. प्रवेशद्वारांना गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा आणि महादरवाजा अशी नावे आहेत. लोहगडावर शंभर लोक एकत्र राहू शकतील अशी गुहा आहे. स्वराज्याच्या ऐतिहासिक खुणा पाहण्यासाठी या गडाला जरूर भेट द्या.