News

The publication of the ‘Flora of Pune District’ by Dr..NP Singh and Dr. CR Jadhav is important for me, not just because it covers my own district, but more personally because it was the lifelong dream of my late friend and mentor, Dr. C. R. Jadhav. During my Ph.D. days, he was a constant source of support and guidance, and though he passed away very early, seeing his Flora getting published now feels like a heartfelt tribute to his dedication and our friendship.

पुणे जिल्ह्याचा फ्लोरा ‘बिशन सिंग महेंद्र पाल सिंग’ तर्फे प्रकाशित होत आहे याचा मला विलक्षण आनंद होतोय. मी पुणे जिल्ह्यात राहतो आणि त्या जिल्ह्याचा फ्लोरा अजून प्रकाशित नाही, आणि तो होतोय हे यातलं अगदी नगण्य कारण आहे, खरं कारण म्हणजे आमचे मित्र कैलासवासी डॉ. सी आर जाधव सरांचा हा फ्लोरा आहे हे वैयक्तिक जास्त जिव्हाळ्याचं कारण आहे.

माझ्या पीएचडीच्या दरम्यान जी चांगली माणसे भेटली त्यात जाधव सर होते. आम्ही काम करायचो तेंव्हा ते बीएसआय च्या हर्बेरियमच्या दुसऱ्या मजल्यावर बसायचे. रुबीएसी आणि एस्टरेसी फॅमिलीची कपाटे त्यांच्यामागेच होती. तेंव्हा हर्बेरियम स्पेसिमेन्स पाहण्यासाठी तिकडे नेहमी जाणे होत असे. ते फार आस्थेनं आम्हा रिसर्च स्टुडन्टची चौकशी करत. बरेचदा आपले स्वतःचे हातातले काम बाजूला सारून आम्हाला मदत करत, स्पेसिमेन्स शोधून देत. त्या वेळी नुकतेच त्यांनी पुणे फ्लोरावरच्या पीएचडी साठी रजिस्टर केले होते, आणि या अफाट पसरलेल्या आणि पूर्वसुरींनी भरपूर काम करून ठेवलेल्या जिल्ह्याचा फ्लोरा करणे म्हणजे केवढे मोठे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे ते त्यांच्या हळूहळू लक्षात येत होते.

माझ्या साडेतीन वर्षांच्या मोलें प्रोजेक्ट दरम्यान त्यांच्याशी अनेकदा चर्चा होत, अनेक गोष्टी त्यांच्याकडून नव्याने कळून जात. सेनेशिओची एक नवीन जाती प्रकाशित करावी म्हणून आम्ही दोघांनी काही फील्ड वर्कही एकत्र केले होते आणि पुढे अर्ध्यामुर्ध्या अभ्यासावर असे काही पब्लिश करायचे नाही हा निर्णयही लवकरच घेतला होता. पण या भटकंतीत सूर जुळले ते कायमचेच.

आमची पीएचडी पूर्ण झाली तरी त्यांचे भलेथोरले काम चालूच राहिले. कधीकधी खूप लांबलेली कामे तुमचा उत्साह संपवून टाकतात आणि असे झाले तर बऱ्याच जणांचे काम अर्धवट तसेच अपूर्ण राहते. पण या दीर्घ काळात जाधव सरांसमोर थिसीसचे काम पूर्ण करणे आणि तो फ्लोरा पब्लिश करणे ही कामे एखाद्या जीवनध्येयासारखीच होती.

थिसीस सबमिट करायच्या आधी तीन चार दिवस त्यांच्या घरी थोडीफार मदत करायला जाणेही झाले आणि त्यांचे थिसीसचे स्वप्न पूर्ण करायला अल्पसा हातभार लावणेही झालेही, पण त्यांनी केलेल्या मदतीची पूर्ण भरपाई कधीच झाली नाही. पुढे भेटी दुर्मिळ होत गेल्या,पण फोनच्या माध्यमातून संपर्क होत राहिले. फ्लोरा लवकर पब्लिश करा नाहीतर मीच तो करतो अशी एक गंमतवजा धमकी मी त्यांना अनेकदा देत असे.

तीनएक वर्षांपूर्वी ते दवाखान्यात ऍडमिट आहेत हे समजले आणि त्याच दिवशी संध्याकाळी ते गेल्याचीही दुःखद बातमी कळाली. एक शेवटची भेटही राहून गेली. रिटायरमेंट होण्याआधी तीन एक वर्षे शिल्लक असताना सर गेले, चुकीच्या औषधयोजनेमुळे गेले आणि त्यांच्या त्या फ्लोराच्या स्वप्नाचे काय होणार हा प्रश्नच राहिला. त्यांच्याबद्दल लिहायचं ठरवलं पण तेही मागं पडत गेलं. त्यामुळे त्यांचा फ्लोरा प्रकाशित होत आहे हे वाचलं आणि भरून आलं.

त्या पीएचडी काळच्या मरूभूमीत ओऍसिस असलेले फार थोडे लोक होते, त्यातले जाधव सर होते. ‘दिल मिले या ना मिले, हाथ मिलाते रहिये’ हे मी बाकीच्या अनेक माणसांच्या बाबतीत आयुष्यभर केलंय. पण या पार्श्वभूमीवर जाधव सरांची असलेली मैत्री लख्ख उजळून दिसते. ज्या नात्यांना वर्तमानी फायदा पाहत्या मनोवृत्तीचे कण चिकटलेले नसतात, ती फार लांबवर जातात हे अगदी खरंय. जाधव सरांसोबाबतचे नाते म्हणूनच दीर्घकाळ स्मरणात राहणारे आहे.

सर, तुम्ही जिथे असाल तिथे हा फ्लोरा पाहून नक्कीच खुश असाल. आम्ही इथे तुमची अजूनही आठवण काढत आहोत!